योग केवळ व्यायाम नव्हे; तर परिपूर्ण जीवनशैली   

योगतज्ज्ञ डॉ. संप्रसाद विनोद यांचे प्रतिपादन

पुणे : योग हा केवळ शारिरीक व्यायाम नसून, एक परिपूर्ण जीवनशैली आहे. जो मन, शरीर आणि आत्मा यांचा समन्वय साधतो. यामध्ये आसने, प्राणायम आणि नैतिक तत्त्वांचा समावेश होतो. योगामुळे तणावमुक्ती, मानसिक शांती आणि शारिरीक स्वास्थ्य प्राप्त होते, ज्यामुळे जीवन आधिक संतुलित आणि समृद्ध होते, असे प्रतिपादन योगतज्ज्ञ डॉ. संप्रसाद विनोद यांनी केले. 
 
वक्तृत्वोत्तेजक सभेतर्फे आयोजित ‘वसंत व्याख्यानमाले’च्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी ज्ञानसत्रातील अद्वैत बडवे स्मृती व्याख्यानात ‘योग-एक परिपूर्ण जीवनशैली’ या विषयावर डॉ. संप्रसाद विनोद बोलत होते. 
 
डॉ. संप्रसाद विनोद म्हणाले, अभिजात योग हे अनुभूतीजन्य ज्ञान आहे. अभिजात योगसाधना हे ‘स्व’ला जाणून घेण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. योगाकडे व्यापक जीवनशैली म्हणून पाहिले पाहिजे. योगाची व्याप्ती खूप मोठी असून ती समजण्यासाठी आपण त्याचा अभ्यास केला पाहिजे. योग म्हणजे केवळ व्यायाम नाही, तर ती एक जीवनशैली, एक तत्त्वज्ञान आहे. जे आपल्याला ‘स्व’ शी आणि विश्वाशी जोडते. योग हा एक प्रवास आहे. स्वतःकडे, सत्याकडे आणि शांतीकडे जाणारा प्रवास आहे. या प्रवासात कोणतीही स्पर्धा नाही, कोणतेही दडपण नाही. शारिरीक पातळीवर शरिराच्या हालचाली करण्यासाठी आपल्या शरिराचे इतर घटक मन, बुद्धी एकमेकांशी जोडली गेली पाहिजे. योगाचा अभ्यास आत्मबोधासाठी केला पाहिजे, असेही यावेळी डॉ. संप्रसाद विनोद यांनी सांगितले. 
 
योगसाधना ओढून-ताणून करता येत नाही. त्यासाठी आत्मबोध होणे हे योगाचे उद्दिष्ट आहे. योगाची संकल्पना आपण समजून आचारणात आणण्याची गरज आहे. विचाराची प्रचिती येणे म्हणजे ध्यान. अज्ञानाचे ज्ञान करुन घेणे हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. आपल्या शरिरातील चैतन्यशक्ती जागी करण्यासाठी शरिराची ओळख करुन घेतली पाहिजे, असेही यावेळी डॉ. संप्रसाद विनोद यांनी सांगितले. मनाशी आणि विचारांशी मैत्री झाली पाहिजे, असेही यावेळी त्यांनी नमूद केले. प्रस्ताविक सूत्रसंचालन संपदा लोहगावकर यांनी केले.

Related Articles